आजकाल तसे आपल्याला काहीही होत नसताना “रुटीन” तपासण्या करण्याची पद्धत आहे. त्याला इंग्रजीत “स्क्रीनिंग” म्हणतात. काही विशिष्ट आजारांचेच फक्त अत्यंत प्राथमिक अवस्थेत निदान करण्यासाठी ही तपासणी पद्धत वापरायची असते. नक्की कुठल्या चाचण्या ह्या दृष्टीने कराव्यात ह्याचे वैज्ञानिक पुराव्यावर आधारित दिशा दर्शन वैद्यकीय व्यावसायिकांना त्यांच्या सातत्याने होणाऱ्या व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमाद्वारे उपलब्ध करून दिलेले असते.
जेव्हा स्क्रीनिंग हे विशिष्ट हेतूने केलेले, पुराव्यांवर आधारित आणि खऱ्या खुऱ्या जोखमीशी सुसंगत असते, तेव्हा ते जीव वाचवते. परंतु, जेव्हा ते निव्वळ सवय, व्यावसायिक दबाव किंवा केवळ खात्री करून घेण्यासाठी केले जाते, तेव्हा ते नुकसान करू शकते, हानी करू शकते. त्यातून अनावश्यक खर्च होऊ शकतो.
काहीही लक्षणे नसताना केलेल्या स्क्रीनिंग तपासण्यांमुळे ओव्हरडायग्नोसिस होऊ शकते किंवा false positive रिझल्ट आल्यामुळे (रोग नसूनही असल्यासारखा टेस्ट रिझल्ट, जो येऊ शकतो) रुग्णाला मानसिक चिंता भेडसावू शकते. आणि मग त्यातून पुढील अनावश्यक वैद्यकीय प्रक्रियांना सामोरे जावे लागू शकते. विनाकारण केल्या जाणाऱ्या चाचण्यांमुळे रक्तदाब नियंत्रण, धूम्रपान सोडवणे आणि लसीकरण यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टींसाठी दिला जाऊ शकणारा वेळ वाया जातो.
एपिडेमियॉलॉजिस्ट डॉ. जेफ्री रोझ यांनी एक धोक्याचा इशारा दिला आहे की निरोगी लोकसंख्येमध्ये आजार शोधण्यापूर्वी आपल्याकडे या गोष्टीचा ठोस पुरावा असणे आवश्यक आहे की, त्यानंतर केल्या जाणाऱ्या उपचारांमुळे फायद्याऐवजी नुकसान जास्त होणार नाही.
लक्षण नसलेल्या व्यक्तीच्या बाबतीत वैद्यकीय नियमांचे पालन करणे हे एक मोठे नैतिक आव्हान असते. वैद्यकीय केंद्रे आणि आरोग्य यंत्रणा ज्या विनाकारण आणि नियमित स्क्रीनिंग चाचण्यांचा आक्रमकपणे आग्रह धरतात, त्यांना हे पूर्णपणे ठाऊक असते की, सुरुवातीची एक चाचणी ही त्यांच्या संस्थेसाठी पैशांची लॉटरी ठरू शकते.
हेतूशून्य पद्धतीने स्क्रीनिंग चाचण्या करून जनतेला ओव्हरडायग्नोसिसच्या धोक्यात ढकलून वैद्यकीय उद्योगासाठी लाखोंचा महसूल गोळा केला जाऊ शकतो, ज्यातून रुग्णाला दीर्घायुष्याची कोणतीही हमी मिळत नाही. मग केवळ सवय आणि अंधश्रद्धेव्यतिरिक्त, आपण विनाकारण केल्या जाणाऱ्या अशा स्क्रीनिंगला इतके का चिकटून आहोत?
व्यावसायिक दबावापलीकडे, एक मानसशास्त्रीय कारण देखील यात दडलेले असू शकते: ते म्हणजे चाचणीचा अहवाल सामान्य (Normal) आल्यावर मिळणारा 'प्लेसिबो' (placebo) परिणाम. रुग्णासाठी, त्याचा स्कॅन किंवा लॅब रिपोर्ट नॉर्मल आला आहे हे समजणे त्याला तात्पुरती मानसिक शांतता देऊन जाते. डॉक्टरांसाठी, तो नॉर्मल रिपोर्ट एका प्रकारचा भावनिक आधार बनतो. डॉक्टरांच्या मनातही लपलेली आजार सुटण्याची किंवा वैद्यकीय निष्काळजीपणाच्या खटल्याला (malpractice suit) सामोरे जाण्याची भीती असल्यास तिच्यापासून बचावाचे तो एक प्रकारे अस्त्र बनतो.
हे परस्पर सांत्वन उत्तम वैद्यकीय उपचारांसारखे वाटते, परंतु तो एक भ्रम असू शकतो. एका सुदृढ रुग्णाची मानसिक चिंता आणि डॉक्टरांची अनिश्चिततेबद्दलची अस्वस्थता दूर करण्यासाठी आपण एक मानसशास्त्रीय उपाय म्हणून महागड्या, संभाव्य धोकादायक निदान यंत्रांचा वापर करत आहोत का? ही खरोखरच योग्य पद्धत आहे का?
रिपोर्ट नॉर्मल येण्याचे आकर्षण दोन्ही बाजूंच्या व्यक्तींच्या मनात खोलवर रुजलेले आहे. स्क्रीनिंग संस्कृतीमध्ये सुधारणा करण्यासाठीच्या कोणत्याही प्रामाणिक प्रयत्नात या “नॉर्मल टेस्ट” बद्दल वाटणाऱ्या आकर्षणाचा प्रथम स्वीकार करणे आणि त्यावर तोडगा काढणे आवश्यक आहे.
वानगी दाखल, काही शिफारस योग्य चाचण्या पाहू. जसे की गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे (cervical cancer) स्क्रीनिंग, आणि नियमित लिपिड व रक्तदाब तपासणी हे सर्व विज्ञानाच्या मर्यादेत बसतात. अशा वेळी लवकर निदान झाल्यामुळे भविष्यातली गुंतागुंत कमी होऊ शकते आणि रुग्णाचे आयुष्य खरोखर वाढते, न की रुग्णाचा केवळ आजाराच्या छायेखाली जगण्याचा वेळ वाढतो.
याउलट, कमी जोखीम असलेल्या व्यक्तींसाठी संपूर्ण शरीराचे स्कॅन (whole-body scans), स्क्रीनिंग ईसीजी (ECGs), किंवा ऑटोमेटेड लॅब पॅनेल्स यांसारख्या चाचण्या विनाकारण आणि सरसकट लिहून देण्यास आपण सक्रियपणे विरोध केला पाहिजे.
जेव्हा एखादा निरोगी रुग्ण विनाकारण चाचणी करण्याची मागणी करतो, तेव्हा वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित आपण दिलेला सर्वात प्रामाणिक प्रतिसाद काय असायला हवा?
त्या व्यक्तीचा तो विशिष्ट आजार होण्याची जोखीम किंवा धोक्याची पातळी काय आहे ह्याबद्दल, तसेच मानसिक शांततेची आपली सामायिक भूक याबद्दल त्यांच्याशी स्पष्टपणे संवाद साधणे हाच असायला हवा. वैज्ञानिक पुराव्यावर आधारित व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांनी हे स्पष्ट केले पाहिजे की, जेव्हा शरीराचे रोजचे अंतर्गत संकेत सर्व काही ठीक असल्याचे दर्शवत असतात, तेव्हा विनाकारण चाचण्यांची भर घालणे हीच गोष्ट व्यक्तीच्या आरोग्याला बाधा आणू शकते.
नुस्त्या टेस्ट करणारे डॉक्टर न बनता पेशंटचे म्हणणे ऐकून त्याच्या तक्रारींचे योग्य निदान करून फक्त आवश्यक त्याच चाचण्या फक्त गरज असेल तरच करण्याची पद्धत सुरक्षित आहे. त्याबरोबरच एरवी अंदाधुंद पद्धतीने केलेल्या चाचण्या काय करू शकतात याच्या मर्यादा मान्य करण्याची नम्रताही आवश्यक आहे.
आपले मार्गदर्शक तत्त्व नेहमीच हे असायला हवे: “सर्वप्रथम, कोणतीही हानी होऊ नये.”
हे लिखाण डॉ. जॉर्ज लंडबर्ग ह्यांच्या ब्लॉगवर आधारित आहे.